Congress Pudhari
मुंबई

Maharashtra SIR Voter List: संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बूथनिहाय प्रसिद्ध करा; काँग्रेसची मागणी

मतदारसंघ आणि बूथनिहाय यादी प्रसिद्ध करा; दावे-हरकतींसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: एसआयआरच्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. निवडणूक आयोग वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करत नाही. त्यामुळे संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बूथनिहाय प्रसिद्ध करा. तसेच, दावे व हरकतींसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्‍वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्‍कलिंगम यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी विजय वडेट्टीवार, नसीम खान, अमीन पटेल, भाई जगताप उपस्थित होते.

राज्यात मतदारांची संख्या ९ कोटी ७८ लाख होती, यातून ३ कोटी २८ लाख मतदारांना वगळले तर ६ कोटी ५० लाख मतदार राहतात. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे तर प्रौढ लोकसंख्या १० कोटींच्या वर असल्याचे सरकारी आकडे सांगतात, हे आकडे पाहता १० कोटी मतदार असायला हवेत; पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ते ६ कोटी ५० लाख आहेत.

सरकारच्या वेगवेगळ्या विभागांतील आकडे वेगवेगळे कसे? यातून निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा दिसत आहे. राज्यात गणेशोत्सवासह इतर सण व उत्सव असताना दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरची वेळ निवडणूक आयोगाने दिली आहे, ही वेळ तीन महिने वाढवून दिली पाहिजे; पण निवडणूक आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सर्व संशयित मतदारांचा ३ कोटी २८ लाखांचा डेटा प्रकाशित करायला हवा, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, मतदारसंघ, बूथनिहाय ही यादी प्रसिद्ध करायला हवी; पण तसे केलेले नाही. ही आकडेवारी निवडणूक आयोग का लपवून ठेवत आहे, काय गौडबंगाल आहे, अशी टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT