मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
केंद्रीय अर्थसंकल्पात जागतिक स्तरावर तंत्रस्नेही होण्यासाठी काही विशेष घोषणा केलेल्या आहेत. त्यातील सेमीकंडक्टर या घोषणेचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला कसा घेता येईल, यासंदर्भात सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. 40 हजार कोटींची विशेष तरतूद सेमीकंडक्टरनिर्मितीसाठी करण्यात आली आहे.
सेमीकंडक्टर ही जगाची गरज असून, चीनमध्ये याचे उत्पादन व्हायचे. आता भारताने या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील वातावरण लक्षात घेता सेमीकंडक्टर व्यवसायाला येथे सर्वाधिक चालना मिळेल. यासाठी नागपूर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या काही वर्षात सेमीकंडक्टर उभारणीसाठी मोठे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. सध्या तळोजा परिसरात एका खासगी व्यावसायिकाने सेमीकंडक्टर क्षेत्रात पाय रोवले असून, ओसाट फॅसिलिटी असलेली ही एकमेव कंपनी आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्राचा विकास आणि त्यासंदर्भातील हालचाली युद्ध पातळीवर होतील आणि त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी व्यक्त केला. 40 हजार कोटींचा राखीव ठेवलेला निधी व्यवसाय वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात चालना देणारा आहे. नव्या कंपन्यांनी यात शिरावे आणि याचा लाभ घ्यावा यासाठी हालचाली सुरू झाल्याचे धवसे यांनी सांगितले.
भारताने घोषित केलेल्या सेमीकंडक्टर धोरणाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी सर्वच राज्ये समोर येत आहेत. मात्र, त्यांच्याकडील मनुष्यबळ आणि व्यवस्थापन या निकषावर महाराष्ट्राचा क्रमांक पुढचा असेल. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या एक-दोन महिन्यांत महत्त्वाचे करार होतील, असा विश्वास धवसे यांनी व्यक्त केला.
सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाने व मोठ्या कंपन्यांचे सहकार्य घेतले जाणार.
अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे सेमीकंडक्टरसह संबंधित (सपोर्टिंग) उद्योग भारतात गुंतवणूक करण्यास आकर्षित होतील.
सुरक्षाविषयक व उत्पादनपूरक धोरणांमुळे हाय-एंड मशिनरी उत्पादन क्षेत्रात लवकरच हालचाली.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम असल्याचा संदेश गुंतवणूकदारांना दिला जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची गुणवत्ता आणि कौशल्य लक्षात घेता या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा तोडीस तोड कोणी नाही.
ॲपलसारख्या मोठ्या कंपन्या स्थानिक कंपन्यांच्या माध्यमातून उत्पादन करतात; अशा कंपन्या महाराष्ट्रात कशा विकसित होतील यावर लक्ष.
भारताने 2032 पर्यंत सेमिकंडक्टर उत्पादनात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर येण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.