मुंबई: राज्यात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना व्यवहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतच्या सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १९ ऑगस्ट रोजी वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मंत्रालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात रिक्षा आणि टॅक्सीचे ९ लाख ७८ हजार ५४१ परवाने आहेत. यामध्ये ९ लाख १६ हजार ८८४ रिक्षा आणि ६१ हजार ६५७ टॅक्सीचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे ४ लाख ६२ हजार ३८७ रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत.
व्यावसायिक वाहनचालक दररोज हजारो प्रवाशांशी थेट संवाद साधत असतो. त्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनेक अमराठी चालकांना मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळले आहे.
१ लाख ६५ हजार चालकांचा सहभाग
परिवहन विभागाच्या पुढाकाराने गेल्या साडेतीन महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम’ अभियानाला आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी मराठी भाषा शिकण्याची तयारी दर्शविली आहे.
या अभियानात सहभागी न झालेल्या अथवा अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या चालकांपर्यंतही पोहोचणे आवश्यक आहे.
अभियान संपले तरी उपक्रम सुरू
‘मराठी शिका’ अभियान संपले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुढे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना परिवहन विभागाचे पूर्ण सहकार्य राहील.
नवीन नियमावलीनुसार व्यवहारिक मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. परिवहन विभागाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून १०५ दिवस ‘मराठी शिका’ हे अभियान राबविले. मात्र, आता कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या उर्वरित अमराठी चालकांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावी, याबाबत मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.