मुंबई : युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरमच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यावेळी लोकेश चंद्र यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. pudhari photo
मुंबई

Maharashtra Nuclear Energy : अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज

अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ सौर आणि पवन उर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसून अणुऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर) ही भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यूएस न्यूक्लिअर एक्झिक्यूटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूट आणि युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी राज्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध अमेरिकन कंपन्यां आणि संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. वाढते औद्योगिकीकरण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे स्थिर व सातत्यपूर्ण वीज निर्मितीची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. आगामी काळात सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे वीजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे.

भारत-अमेरिका नागरी अणुऊर्जा सहकार्याबाबत गेल्या काही वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून खासगी क्षेत्राचा सहभाग, ‌‘शांती‌’ फ्रेमवर्कअंतर्गत सुधारणा, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक सहकार्यामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारत हा आगामी अनेक दशकांत वेगाने वाढणारी वीज मागणी असलेला देश ठरणार असून महाराष्ट्र हा त्यातील सर्वात मोठा औद्योगिक घटक ठरणार आहे.

भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे, तर न्यूक्लिअर उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरे, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणे उपलब्ध असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात न्यूक्लिअर उत्पादन व प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर उभारणीसाठी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. छोट्या स्वरुपातील स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स क्षेत्रातही महाराष्ट्र प्रारंभीचे केंद्र बनण्यास उत्सुक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अणुऊर्जा निर्णायक क्षेत्र

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांत अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढील टप्प्यातील निर्णायक क्षेत्र ठरू शकते. न्यूक्लिअर ऊर्जा ही केवळ वीज निर्मिती नसून औद्योगिक स्पर्धात्मकता, तांत्रिक नेतृत्व, ऊर्जा सार्वभौमत्व, हवामान बदलाची जबाबदारी आणि दीर्घकालीन विश्वासाशी संबंधित विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा यांनी प्रास्ताविकात बैठकीची पार्श्वभूमी विशद केली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्रातील अणुऊर्जा क्षेत्र, त्यातील सुविधा व गुंतवणुकीची संधी याविषयी मते मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT