Doctors Pudhari
मुंबई

Maharashtra PG Medical Seats: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात महाराष्ट्राची भरारी

१ हजार ६६ जागांची वाढ; देशात दुसरे स्थान, शासकीय महाविद्यालयांत ७२० जागा वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागांमध्ये महाराष्ट्राने मोठी झेप घेतली. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्यात ब्रॉड स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या ७ हजार ६१५ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

यंदा १ हजार ६६ जागांची म्हणजेच १६.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे. कर्नाटक ८ हजार ८६२ जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ६ नोव्हेंबर रोजी अद्ययावत केलेल्या आसन मॅट्रिक्सनुसार, महाराष्ट्रानंतर तमिळनाडू ६ हजार ६७८, उत्तर प्रदेश ६ हजार ६७५, तेलंगणा ४ हजार ४०३ आणि आंध्र प्रदेश ४ हजार ३०९ जागांसह पुढील क्रमांकावर आहेत. कोल्हापूर आणि अंबाजोगाई येथे प्रत्येकी ३९, लातूर येथे ३८, नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात ३७, तर सोलापूर आणि जालना येथे प्रत्येकी ३५ जागा वाढल्या आहेत.

भूलशास्त्र, बालरोगशास्त्र, सर्वसाधारण औषधशास्त्र, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, रेडिओडायग्नोसिस यांसह विविध शाखांमध्ये पदव्युत्तर प्रवेशक्षमता वाढविण्यात आली आहे. औरंगाबाद येथे शरीरक्रियाशास्त्राच्या जागा तीनवरून २१, तर जैवरसायनशास्त्राच्या जागा दोनवरून १७ झाल्या आहेत.

कोल्हापूरमध्ये भूलशास्त्राच्या जागा चारवरून १४ करण्यात आल्या आहेत. या वाढीमुळे अधिक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळणार असून, राज्यातील शासकीय रुग्णालयांना भविष्यात अधिक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

शासकीय महाविद्यालयांत ७२० जागांची भर

राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमडी आणि एमएस अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये २९ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ७२० जागांची निव्वळ वाढ झाली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक ७७ जागा वाढल्या आहेत. औरंगाबाद येथे ७३, सातारा येथे ६४, धुळे येथे ४४ आणि अंबरनाथ येथे ४० जागांची वाढ झाली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT