मुंबई: राज्यातील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठीची ‘क्रेझ’ कायम आहे. यंदाही दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेशाला प्रतिसाद दिला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत १ लाख ४१ हजार ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, १०० टक्के गुण मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांनी पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केला असून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या तब्बल ६ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकला पसंती दिली आहे.
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठीची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये राज्यातील १ लाख ४० हजार ३६८, इतर राज्यांतील ५६८ आणि जम्मू-काश्मीर प्रवर्गातील ३ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये ९३ हजार ५४२ मुले आणि ४७ हजार ३९७ मुली आहेत.
राज्यातील ४०० वर पॉलिटेक्निकमध्ये एक लाख २० हजारांहून अधिक प्रवेश क्षमता आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी, कौशल्याधारित शिक्षणाला मिळणारे महत्त्व आणि पदविकेनंतर थेट रोजगार तसेच पदवी अभियांत्रिकीमध्ये प्रवेशाची उपलब्ध संधी, यामुळे विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे कल वाढला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ९०५ ने वाढली आहे. विशेष म्हणजे, ७० ते ८४ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय आहे. दहावीच्या निकालातही याच गुण गटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. त्याचाच परिणाम पॉलिटेक्निक अर्ज प्रक्रियेत दिसून आला आहे.
अंतिम गुणवत्ता यादीतील आकडेवारीत १०० टक्के गुण मिळवलेले ५ विद्यार्थी, ९६ ते ९९ टक्के गुण मिळवलेले ३५२ आणि ९० ते ९५ टक्के गुण मिळवलेले ६ हजार ४४२ विद्यार्थी आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७९९ इतकी आहे.
याशिवाय, ८५ ते ८९ टक्के गुण मिळवलेले १३ हजार ९७ आणि ८० ते ८४ टक्के गुण मिळवलेले १८ हजार ५२५ विद्यार्थीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग पॉलिटेक्निककडे वळला आहे.
गतवर्षी आधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांबरोबरच ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’लाही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली होती.
या विद्यार्थ्यांना १३ जुलैदरम्यान संस्था आणि अभ्यासक्रमांचा पसंतीक्रम भरता येणार असून १५ जुलैला पहिल्या फेरीचे प्रवेश जाहीर होतील. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै या कालावधीत जागा स्वीकारून प्रवेश निश्चित करता येणार आहे.