आता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना घाबरतात, कारण त्यांच्या चुका दाखवल्या जातात
अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचे संकेत पाळायचे नाहीत
मुंबईच्या लढ्यात भारतीय जनता पार्टी कुठेच नव्हती
Sanjay Raut criticism
मुंबई : पार्थ पवार यांचे पिताश्रींचे राज्याच्या राजकारणात मोठे वजन आहे. त्यामुळेच ते एखाद्या कामाचा प्रस्ताव घेऊन आले तर त्यांना बोलायची कोणाची हिंमत आहे, असा टोला लगावत मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रंगसफेदी करू नये, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकेचा आसूड ओढला. आम्ही वडेट्टीवार यांना फार महत्त्व देत नाही. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज (दि. १३ डिसेंबर) माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधिमंडळाची सर्कस झाली आहे. दशावतार सुरू आहे. कामकाजाचे गांभीर्यच संपले आहे. आता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना घाबरतात, कारण त्यांच्या चुका दाखवल्या जातात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता निवडला जात नाही. महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षांच्या भयातूनच विरोधी पक्ष नेत्याची निवड होऊ दिली जात नाही, असा दावाही त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचे संकेत पाळायचे नाहीत. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यामुळे भाजपचे धिंडवडे निघत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून सर्वजण घाबरत आहेत, असे आरोपही त्यांनी केले.
महाराष्ट्राच्या लढ्यात उद्योगपती गौतम अदाणी नव्हते. मुंबईच्या लढ्यात भाजप कुठेच नव्हता. आजचा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांकडून कसा ओरबाडला जातोय, यावर चर्चा व्हावी. महाराष्ट्राच्या प्रश्नात सर्वांनी एकत्र यायला हवं, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भ स्वतंत्र करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावर मिंधे गटातील एकाही मंत्री उसळून उठला नाही. याचा अर्थ सत्ताधारी अमित शहांच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप करत पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलाय. पालघर जिल्ह्याच्या सीमा उल्लंघन करून गुजरातने आता प्रवेश केला, असा दावाही संजय राऊत यांनी केला.