Eknath Shinde Delhi Visit
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विशेष म्हणजे ते त्यांचे नियोजित कार्यक्रम सोडून अचानक बुधवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना शिंदे यांनी दिल्ली गाठली आहे. ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, त्यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते, असे मला तुमच्याकडून कळाले. त्यांनी दिल्लीत कुणाची भेट घेतली? हे काही माहित नसून मी दिवसभर सभागृहात होतो. मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाठी निधी आणणे ही आमची जबाबदरी आहे. त्याच भावनेने शिंदे दिल्लीला गेले असतील,'' असे सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमित शहा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये आहेत. यामुळे शिंदे आणि शहा यांची अद्याप भेट झालेली नाही. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. दरम्यान, अमित शहा याआधी पुणे दौऱ्यावर असताना रवींद्र चव्हाण यांनी त्यांची पुण्यात भेट घेतली होती. आता एकनाथ शिंदे बड्या नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत.
हिंदी सक्तीला विरोध आणि त्यानंतर सरकारने हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र आले. यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र राहण्याचे स्पष्ट संकेतही दिले. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनेही आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
त्यात सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण गाजत आहे. शिळे जेवण दिल्याचे सांगत गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली. संजय गायकवाड यांचे वर्तन भूषणावह नाही, यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते!, असेही फडणवीस म्हणाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेनशन सोडून दिल्लीला गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.