Salim Sarang Joining BJP: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतरही पक्ष फुटीचं सत्र सुरू आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचे ६ खासदार फुटले. ६ खासदारांच्या फुटीने राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. फुटीर खासदार शिंदे सेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शिंदेंची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटील भाजपच्या वाटेवर आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. या नेत्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काल मतदान पार पडलं. राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी पक्षाची साथ देखील सोडली. या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतरही नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्येही नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, अल्पसंख्याक समाजातील नेते सलीम सारंग यांच्याही नाराजीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. सलीम सारंग हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सलीम सारंग यांचा अल्पसंख्याक समाजात चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यांनी पक्षाची साथ सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पसंख्याक मतदारांमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.