Eknath Shinde Pudhari News network
मुंबई

Maharashtra Politics : चिंता पक्षाची प्रतिमा डागाळण्याची!

शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक, तर संजय गायकवाडांवरील कारवाई अटळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मारहाण, बॅगांची चित्रे, आयकर नोटिसा यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याच्या चिंतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले आहे . सर्वात महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाताना जरा भान बाळगा, हे सांगण्यासाठी त्यांनी पक्षाच्या आमदार पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक उद्या ता.14 रोजी बोलावली आहे. भाजपतील श्रेष्ठींनीही या प्रकारांबद्दल शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

विधान भवन सदस्यांसाठी असलेल्या उपाहारगृहातील मारहाण प्रकरणी शिवसेना सदस्य संजय गायकवाड यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, असे सत्ताधारी सहकर्‍यांनी शिंदेसाहेबांना सुचवले आहे, मात्र गायकवाडांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचेही जवळपास निश्चित झाले आहे. सध्या नैतिक आचरण समिती अस्तित्वात नसल्याने कारवाई कशी सुरू करणार, हा हक्कभंगाचा विषय नाही. त्यामुळे काय पावले उचलता येतील याबद्दल विचार सुरू आहे. आंबलेले अन्न खायला देण्याची घटना सभागृहाबाहेरची असल्याने विधिमंडळाच्या कोणत्या नियमानुसार कारवाई करता येईल हे स्पष्ट नाही. या तरतुदीतून मार्ग कसा काढावा याबद्दल विचार सुरू असल्याचे समजते.

प्रसिध्दीमाध्यमात दाखवली जाणारी मारहाणीची दृश्ये लोकप्रतिनिधींबद्दल जनतेत कमालीची अनास्था निर्माण करीत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने सांगितले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. स्वत: एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांच्या कृत्याचे समर्थन केलेले नाही. त्यांना समज देण्यात येईल, असे शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मात्र त्यानंतरही गायकवाड यांनी माफी मागण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे, खराब नासलेले अन्न दिले तर असे उत्तर देणे हेच शिवसैनिकाचे काम आहे याचा पुनरुच्चार केला. उद्या ता. 14 रोजी दोन दिवसांच्या साप्ताहिक रजेनंतर अधिवेशन सुरू होताच शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसतर्फे गायकवाडांवर कारवाई करा, हा विषय पुढे येईल हे निश्चित मानले जाते. या परिस्थितीत अधिवेशनाचे शेवटच्या आठवड्यातले कामकाज अडचणीत येईल. गायकवाड यांचे वक्तव्य पाठीशी घालण्यासारखे नाही, असे सत्ताधार्‍यांचेही मत आहे. त्यांची वागणूक ही आगळीक असेल तर ती सभागृहात घडलेली नाही, त्यामुळे कारवाई कशी होणार, हा प्रश्न आहे. मात्र पोलिसांनी सदर घटनेबाबत गुन्हा नोंदवला आहे.

निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणार्‍या कंत्राटदाराला नोटीस देऊन झाली, आता लोकप्रतिनिधीला पाठीशी घालणे योग्य ठरणार नाही, असे काही बड्या मंत्र्यांचे मत आहे. शिंदे यांचे सहकारी त्यांना अडचणीत आणत आहेत. गायकवाड, संजय शिरसाट, संजय राठोड, संतोष बांगर अशा मंत्री आणि आमदारांमुळे सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात बसावे लागते आहे. त्यामुळे निदान काही तासांसाठी तरी निलंबन करायला हवे, असे मत जोर धरते आहे. दरम्यान सहकार्‍यांच्या वर्तनामुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ता.14 रोजी पक्षाच्या पदाधिकर्‍यांची भेट घेणार आहेत. सध्या नैतिक आचरण समिती नसल्याने कारवाई कशी करायची हा प्रश्न आहे. मात्र वर्तन अहवाल मागवून कारवाई करणे आवश्यक आहे. सत्ताधारी आमदारांवर अंकुश ठेवणे ही गरज असल्याचे मत व्यक्त केले जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने यासंबंधात भारतीय जनता पक्षाशी चर्चा केली आहे, असेही समजते.

संजय शिरसाट हे अत्यंत अभ्यासू गृहस्थ आहेत.त्यांनी व्हिडीओप्रकरणात कोणताही युक्तिवाद न करता थेट पक्षातील महत्त्वाच्या मंडळींचा उल्लेख करीत त्यांना अडचणीत आणणेही धक्कादायक मानले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT