मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने शुक्रवारी एकाचवेळी तब्बल 96 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. बदल्यांमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात वादग्रस्त ठरलेले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली आहे, तर मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय पोलीस सेवेतील 52, तर राज्य पोलीस सेवेतील 44 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण प्रवीण पडवळ यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक या पदावर,तर मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) मनोज शर्मा यांची मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन आणि समन्वय) महाराष्ट्र राज्य सुवेझ हक यांची पोलीस सहआयुक्त (प्रशासन) मुंबई या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई महेश पाटील यांना विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) महाराष्ट्र राज्य या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे अपर पोलीस आयुक्त परमजीत दहिया यांना विशेष पोलीस महानिरीक्षक( दहशतवाद विरोधी पथक) या पदावर पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहे.