Ola Uber Rapido New Rules file photo
मुंबई

Ola Uber Rapido New Rules: ओला-उबेर, रॅपिडोपैकी एका वाहनाला आता एकच सेवा बंधनकारक

राज्यातील ई-बाईक ॲग्रीगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ओला-उबेर, रॅपिडो कंपन्यांपैकी आता एका वाहनचालकाला कोणतीही एकच सेवा निवड करावी लागेल. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तडजोड सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कंपन्यांना सुनावले आहे.

राज्यातील ई-बाईक ॲग्रीगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

शासन आता सर्वंकष आणि कठोर धोरण राबविण्याच्या तयारीत असल्याने संबंधित कंपन्यांनी ई-बाईक 100 टक्के व्यवसाय करण्यासाठी बंधनकारक राहील. पेट्रोल वाहनांचा वापर केल्यास संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. सर्व चालकांचे पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले.

पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय नवीन चालकांची नोंदणी संबंधित ॲपवर करता येणार नाही. ॲपवर नोंदणीकृत वाहनांची ‌‘रिअल टाईम‌’ माहिती परिवहन विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित कंपन्यांनी त्यांच्या ॲपचा ॲक्सेस आरटीओ विभागाला देणे आवश्यक राहील. त्यामुळे कोण कोणत्या कंपनीशी संंलग्न आहे, यावर थेट नियंत्रण ठेवता येईल.

सध्या एकाच चालकाकडे अनेक कंपन्यांच्या ॲपवर नोंदणी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चालक एका दिवसात ओला, उबेर किंवा रॅपिडो अशा विविध कंपन्यांसाठी सेवा देत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून एका दिवसात चालकाला फक्त एका कंपनीकडूनच परवानगी देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT