मुंबई : मान्सून माघारी फिरल्यानंतर राज्यात सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा जोरदार तडाखा बसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीच्या तापमानात मोठी वाढ झाल्याने होरपळून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, बुधवारी राज्याचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला. दरम्यान, रत्नागिरी येथे ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. असे असले तरी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत गुरुवार (दि. १५) पासून मंगळवार (दि. २०) पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
अवकाळीचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीच्या भागात तापमान वेगाने वाढत आहे. विदर्भातील बहुतांश भाग प्रथम तापला असून उष्णतेमुळे सर्वच भागांत कमालीचा उष्मा जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, आजपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळीमुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शुक्रवारपर्यंत पारा चाळिशीत
महामुंबई प्रदेशात उष्ण लाटेचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत बधवारी गेल्या आठ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली; उपनगरांमध्ये तापमान ३८.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. सोमवारपासून सांताक्रुझ वेधशाळेत विक्रमी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. गुरुवारी ते ३७ वर होते. या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी उष्ण लाटेचा धोका आहे. गुरुवारपासून किमान तापमानातही (२६ अंश सेल्सिअस) वाढ अपेक्षित आहे.
काळजी घ्या
सतत वाढत असलेल्या तापमानाचा राज्यातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही भागात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे उन्हात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.