Palghar Chemical Park Pudhari
मुंबई

Palghar Chemical Park| महाराष्ट्रातील रसायन उद्योगासाठी लवकरच स्वतंत्र धोरण: मुख्यमंत्री

पालघर जिल्ह्यातील पार्कसाठी ५ हजार एकर जमीन संपादित करणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रातील रसायन उद्योगाला चालना देत या क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी लवकरच राज्याचे नवीन रसायन धोरण जाहीर केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

तसेच, वाढवण बंदराच्या परिसरात पालघर येथे भव्य रसायन पार्क उभारण्यासाठी अडीच ते पाच हजार एकर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत १४ व्या ‘इंडिया केम २०२६’चे उद्‌घाटन पार पडले. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार रसायन उद्योगासाठी स्वतंत्र आणि विशेष धोरण तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल.

यातून उद्योगांच्या गरजा, भविष्यातील गुंतवणूक व उद्योगस्नेही वातावरण निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. तसेच, वाढवण बंदराच्या परिसरात पालघर येथे भव्य रसायन पार्क उभारण्यासाठी २,५०० ते ५,००० एकर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारून औषधनिर्मिती क्षेत्रासाठी सक्षम औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याद्वारे जेनेरिक औषधनिर्मितीत भारताचे जागतिक स्थान अधिक बळकट करण्यासह मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सध्या राज्यातील रसायन उद्योगातून सुमारे ३ लाख रोजगार निर्माण होत असून, योग्य धोरणांच्या माध्यमातून रोजगार दुप्पट आणि गुंतवणूक तिप्पट करण्याची क्षमता असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT