maharashtra nagar parishad election results
राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे २१ डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं ३ डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
यापूर्वी राज्य निवडणूक आयोगानं जवळपास २४ ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या २० डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज २ डिसेंबर रोजी होणारं मदतदान आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचे एकत्रित निकाल हे २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील.
ज्यावेळी राज्य निवडणूक आयोगानं जवळपास २४ जास्त ठिकाणच्या नगरपालिकेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर ३ तारखेला होणारी मतमोजणी देखील पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता नागपूर खंडपीठानं ३ तारखेला होणारी मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. आज २ डिसेंबरला राज्यातील बहुतांश नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकांसाठी मतदान होत आहे. मतदान सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगानं मतदानाच्या आधी एक दिवस काही नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा आदेश काढला होता. या पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका या २० डिसेंबर रोजी होतील असं आदेशात म्हटलं होतं.
निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर काही लोकांनी नागपूर खंडपीठात याविरोधात याचिका दाखल केली होती. यात वर्ध्याच्या देवडी मधील एका याचिकाकर्त्यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती. याचिकेत सर्व निकाल हे एकसोबतच लावण्यात यावे अशी मागणी केली होती.
त्यावर नागपूर खंडपीठानं हा महत्वाचा निर्णय दिला आहे. आता २४ नगरपालिका आणि परिषदांच्या मतदानानंतरच राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागणार आहे.