पहिला बार नगरपालिका, नगरपरिषदांचा?  pudhari photo
मुंबई

Municipal elections : पहिला बार नगरपालिका, नगरपरिषदांचा?

दिवाळी संपताच महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

दिवाळी संपताच महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजणार हे स्पष्ट असतानाच पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. मतयंत्रांची संख्या पर्याप्त प्रमाणात असल्याने एकाच वेळी जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका घेणे शक्य असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटामुळे मतदान घेणे शक्य आहे काय, अशी विचारणा आयोग जिल्हा प्रशासनाकडे करणार आहे. यात पंचनामे, मदतकार्य यात येते काही दिवस सरकारी यंत्रणा गुंतलेली असेल असे अनौपचारिकपणे राज्याच्या काही भागातील महसूल प्रशासनाकडून सांगितले जाते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरसकट एकत्र सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे एकाच वेळी मतदान न घेता आधी नागरी भागातील मतदान होण्याची दाट शक्यता आहे.

आयोगाने त्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.यासंदर्भात सध्या कोणतीही माहिती देणे शक्य नाही, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुका होतील असे आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. एकदा मतयंत्र वापरल्यानंतर मतनोंदणीची चीप काढून ती आगामी टप्प्यातील निवडणुकीसाठी वापरली जाते. मात्र त्यात 45 दिवसांचा कुलिंग पिरिएड लागतो, असे सांगितले जाते आहे.

दरम्यान आयोगाची ही तयारी सुरू असतानाच राजकीय पक्षांनीही आपापली तयारी चालू केली आहे.भाजपच्या विभागीय मेळाव्यात पक्षसंघटनेच्या, स्थानिक कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहेत तसेच सरकार त्यांचे काम करण्यात मदतगार ठरते आहे काय,याचा आढावा घेतला जात आहे.

भाजपने समन्वयाची जबाबदारी विशिष्ट नेत्यांवर सोपवली आहे. शिंदेंच्या शिवसेनेही लढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये समन्वयाची जबाबदारी विशिष्ट नेत्यांवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने सुरू केलेली विकासाची कामे हेच भाजपचे प्रचाराचे धोरण असेल असे संगितल्याचे समजते. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी तेथील काही विशिष्ट नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. निवडणुकीला आवश्यक असलेली संसाधने पुरवण्याचे कामही त्या त्या मंत्र्यांकडे सोपवण्यात येणार आहे.

  • ग्रामीण भागातील अतिवृष्टीने निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेणार

  • आधी नागरी भागातील मतदान होण्याची दाट शक्यता

  • मतदान यंत्रांची पुरेशी संख्या

  • एकाच वेळी जि.प.,

  • पं. स. तसेच पालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका घेणे शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT