COVID Testing In Maharashtra
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून गुरुवारी 76 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 27 , ठाणे मनपा 12, पुण्यात 21, कल्याण 8 कोल्हापूर व अहिल्यानगर 1, नवी मुंबई 4, रायगडमध्ये 2 रुग्ण आढळून आला आहे. तर आजअखेरपर्यंत मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे.
जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 9592 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 597 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी आज सक्रिय रुग्ण 425 आहेत. त्यातील 379 रुग्ण मुंबईत सापडले आहेत. आतापर्यंत 165 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.
कोविड रुग्णांची वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही फक्त काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. 85 रुग्णांची आरटीपीसीआर तर 87 रुग्णांची कोव्हिड 19 टेस्ट करण्यात आली होती. तीन रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे. गेल्या आठवड्याभरात महापालिका आणि खाजगी रुग्णालयात 85 रुग्णांची आरटीपीसीआर केली होती.आज गुरुवारी 25 रुग्णांची आरटीपीसीआर केली. आज एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. ऐरोली, दिघा, तुर्भे ,शिवाजीनगर आदी ठिकाणी हे रुग्ण आढळून आले.
त्यापैकी एका रुग्णास अंतरवर्ती फुप्फुस रोग आयएलडी होता. एका 47 वर्षीय महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती. एका रुग्णास मधुमेह अणि दहा वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आलेला त्याचा त्रास सुरू होता यासोबतच या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले होते.