Maharashtra rain deaths pudhari photo
मुंबई

Maharashtra Rain Update | पावसाचं रौद्र रूप! राज्यात अतिवृष्टीने पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू

Monsoon 2025 | राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनमुळे मोठा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. तर, अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मोहन कारंडे

Maharashtra Rain Update |

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गेल्या ५ दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये पाण्यात बुडून, वीज कोसळून, भिंत पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सुमारे २२ प्राण्यांचाही पावसामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी

पुण्यामध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा अंगावर झाड पडून, तर दुसऱ्याचा भिंत पडून आणि तिसऱ्याचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. जालन्यात दोघांचा पाण्यात बुडून तर अहिल्यानगरमध्ये दोघांचा अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला.

  • मुंबई शहर - १ (झाड पडून मृत्यू)

  • मुंबई उपनगर -१ (झाड पडून मृत्यू)

  • नागपूर - १ (वीज पडून मृत्यू)

  • नांदेड - ३ (पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू)

  • वर्धा - १ (वीज पडून मृत्यू)

  • चंद्रपूर - १ (वीज पडून मृत्यू)

  • भंडारा -२ (वीज पडून मृत्यू)

  • बीड -१ (पाण्यात बुडून मृत्यू)

  • यवतमाळ - १ (पाण्यात बुडून मृत्यू)

  • गोंदिया -१ (मृत्यूचे कारण अस्पष्ट)

  • रायगड - १ (मृत्यूचे कारण अस्पष्ट)

अतिवृष्टीने राज्यात ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनमुळे पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढून ४० हजार ९४९ हेक्टरवर पोहोचला आहे. त्यामध्ये उन्हाळी हंगामातील बहुतांश पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अमरावती, बुलडाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये) : अमरावती १२,५६५, अकोला ९०९, चंद्रपूर १,५७२, बुलडाणा ६,६९९, जळगाव ४,५३८, पालघर ७९६, लातूर ९५७, जालना १,७२६, छत्रपती संभाजीनगर ४५६, सोलापूर १, ६८२, अहिल्यानगर १,४४१, नाशिक ३,५२३, पुणे ६७६, कोल्हापूर ९५, सांगली ६, सातारा ७३.

महाराष्ट्रात यंदा महावृष्टी!

मान्सून बरसण्यास अनुकूल वातावरण असल्याने जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत महाराष्ट्रावर 'महावृष्टी' होणार आहे. कोकणात सरासरी १०७ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११० टक्के, मराठवाडा ११२ टक्के, तर विदर्भात १०९ टक्के पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच, जूनमध्ये राज्यात १०८ ते ११२ टक्के जास्त पाऊस पडेल, असेही अंदाजात म्हटले आहे. मे महिन्यात राजस्थान वगळता उर्वरित भागातील अंदाज चुकले, अशी कबुलीही हवामान विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT