मुंबई: राज्यातील मत्स्य साठ्याचे जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत १५ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या काळात परराज्यातील नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर केली जाईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
आपल्या निवेदनात मंत्री नितेश राणे म्हणाले की, पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने केंद्र शासनाच्या धोरणानुसार १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा बंदी कालावधी निश्चित करण्यात आला होता.
यानुसार, राज्य शासनाने यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना या ६१ दिवसांच्या काळात बंदी घातली होती. मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर लहान माशांची (बीज) मासेमारी होते, ज्याचा फटका मत्स्योत्पादनाला बसतो.
त्याला अटकाव करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात यावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांनी सरकारकडे केली होती. या विषयावर जिल्हा तसेच 'राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीने पावसाळी बंदीकाळ १ जून ते १५ ऑगस्ट असा निश्चित करण्याचा अभिप्राय दिला.