Political News Pudhari
मुंबई

Political News: अंबादास दानवेंच्या उमेदवारीने महाविकास आघाडीत फूट?

काँग्रेस देणार उमेदवार; शरद पवार गटाचा मात्र ठाकरे गटाला पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधान परिषदेच्या 9 जागांपैकी महाविकास आघाडी जिंकू शकेल अशा एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आणि महाविकास आघाडीत फूट पडली आहे.

विधान परिषदेचे सभासद म्हणून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच निवृत्त झाले. मात्र पुन्हा ठाकरेंनीच विधान परिषदेवर जावे असा आग्रह करत काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठींबाही जाहीर केला होता. अर्थात उद्धव उभे राहणार नसतील, तर ही एक जागा आम्हाला द्यावी, अशी काँग्रेसने मागणी आधीच केली होती.

उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी, 30 एप्रिल रोजी शेवटचा दिवस असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी महाविकास आघाडीचा उमदेवार म्हणून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करून टाकली. पाठोपाठ काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेी.

शरद पवार गटाने मात्र ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांपैकी त्यांचा एकमेव उमेदवार हमखास निवडून येईल, असे महाविकास आघाडीचे संख्याबळ आहे; पण या एकमेव जागेसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आता स्पर्धा उद्भवली.

उद्धव यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी असून सपकाळ यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. परिणामी काँग्रेसने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसला 12 मतांची गरज

दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला, तर त्यांच्याकडे केवळ 16 मते आहेत. त्यांना आणखी 12 मतांची गरज लागेल; पण इतकी मते त्यांना कुठून मिळणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे आता तरी विधान परिषदेवरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.

मते फुटली तरच ठाकरे गटाची अडचण

उद्धव ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत, तर शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्यात अडचण नाही. मात्र, विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असते, त्यामुळे त्यांची मते फुटली तर अडचणीचे होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT