दिलीप सपाटे
मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार यांना जनतेला भेटण्यासाठी दुपारी ३ ते ५ ही वेळ राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जनतेला मंत्रालयात मंत्र्यांना भेटता यावे म्हणून काढलेल्या आदेशांना अनेक मंत्र्यांनी हरताळ फासला आहे.
मंत्रालयात बसून जनतेचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांचे समाधान करण्याऐवजी अनेक मंत्री हे आपल्या बंगल्यावरून कामकाज करत असल्याने राज्यभरातून येणाऱ्या जनतेला काम होईल की नाही; पण मंत्र्यांना भेटणेदेखील अडचणीचे झाले आहे.
महसूल विभागाने नुकताच ९ सप्टेंबरला एक आदेश काढून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ते नायब तहसीलदार यांना कार्यालयीन वेळेत दुपारी ३ ते ५ या वेळेत जनतेच्या भेटीसाठी कार्यालयात उपस्थित राहणे आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
या वेळेत शक्यतो कोणत्याही शासकीय बैठका न ठेवता केवळ अभ्यागतांना भेटण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, कार्यालयाबाहेर भेटीची वेळ लिहिणेही सक्तीचे केले आहे.
अभ्यागतांच्या भेटीच्या काळात काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहता येत नसेल तर त्याची आगाऊ सूचना देऊन जनतेची निवेदने घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत आदेश दिले आहेत.
दर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात असते. ती झाल्यावर तरी मंत्री, राज्यमंत्री आपल्याला भेटतील या अपेक्षेने राज्यभरातून हजारो लोक मंत्रालयात येत असतात. ते सकाळपासून मंत्रालयासमोर प्रवेशासाठी रांगा लावतात. त्यात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, आजाराची समस्या असलेले लोक, दिव्यांग व्यक्ती अशा सर्वांचा समावेश असतो.
त्यांना मंत्रालयात दुपारी दोन वाजल्यानंतर कसाबसा प्रवेश मिळतो. मोठ्या त्रासानंतर मंत्रालयात गेल्यानंतरही दालनात त्यांना ना मंत्री भेटतो, ना त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला कोणी सक्षम अधिकारी असतो. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतरही त्यांचे समाधान होत नाही.
मंत्र्यांचा बंगल्यात बसून कामावर भर
असाच आदेश २८ मार्च २०२३ रोजी मंत्री आणि राज्यमंत्र्यांबाबतही काढण्यात आला आहे. मंत्री आणि राज्यमंत्री यांनी आपल्या सोयीनुसार सर्वसामान्यांना भेटण्यासाठी वेळ निश्चित करावी. ती वेळ आपल्या कार्यालयाबाहेर लावावी, हे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक मंत्री मंत्रालयात बसतच नाहीत. त्यांचा भर बंगल्यावर बसून काम करण्यावर आहे. तसेच, त्यांनी आपल्या दालनाबाहेर वेळेबाबतचा फलकही लावलेला नाही