मुंबई: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) निवडणुकीपूर्वीच मोठा वाद उफाळून आला असून, मतदार यादीतून तब्बल 69 हजार नोंदणीकृत डॉक्टरांची नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मॅगसेसे व पद्म पुरस्कार विजेते नामवंत डॉक्टरही या यादीतून गायब असल्याचे समोर आले आहे.
डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. विकास आमटे, डॉ. एस. व्ही नाडकर्णी, डॉ. आनंद नाडकर्णी यांचीही नावे वगळली आहेत.
रविवारी 26 एप्रिल रोजी ही निवडणूक होत असून, चार पॅनलमार्फत 60 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 2 लाख 13 हजार मतदारांपैकी 69 हजारांची नावे वगळली गेल्याने आता केवळ 1 लाख 43 हजार मतदारच मतदान करणार आहेत. मुंबईत सुमारे 15 हजार मतदार आहेत.
‘हिलिंग हॅन्ड्स युनिटी’ पॅनलकडून निवडणूक प्रक्रियेतील अनेक त्रुटींवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. याबाबत राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, मुख्य सचिव तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही धाव घेण्यात आल्याचे हिलिंग हॅन्ड्स युनिटी पॅनलचे डॉ. तुषार जगताप यांनी सागितले.
सरकारी नियुक्त्यांवर आक्षेप
निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शासनाने एमएमसीवर थेट नियुक्त्या करण्यासंदर्भात काढलेल्या जीआरवरही आक्षेप घेण्यात आला आहे. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी डॉ. संजय वाठोरे, समन्वयक डॉ. ललितकुमार आनंदे तसेच एमएमसीचे माजी सदस्य डॉ. सुहास पिंगळे यांच्याकडून करण्यात येत आहे.