Maharashtra Medical Admission pudhari photo
मुंबई

Maharashtra Medical Admission : एमबीबीएस, बीडीएसचे ९९.५६ टक्के प्रवेश

राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील सर्व जागा फुल्ल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील एमबीबीएसच्या ८ हजार ८६४ जागांपैकी ८ हजार ८३४ (९९.६६ टक्के), तर बीडीएसच्या २ हजार ६१७ जागांपैकी २ हजार ५९७ (९९.२३ टक्के) जागांवर प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील शासकीय एमबीबीएस आणि बीडीएस महाविद्यालयांमधील सर्वच्या सर्व जागा भरल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) यंदा प्रथमच एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्या राबविण्यात आल्या. यापूर्वी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आणि एक रिक्त जागांची फेरी (स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड) झाल्यानंतर उर्वरित जागा संबंधित संस्थास्तरावर भरल्या जात होत्या.

या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे यंदा शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रवेश नियमांत बदल करून सर्व प्रवेश फेऱ्या सीईटी कक्षामार्फतच राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन, रिक्त जागांच्या तीन आणि विशेष रिक्त जागांच्या (स्पेशल स्ट्रे व्हॅकन्सी) तीन अशा एकूण नऊ फेऱ्या घेण्यात आल्या.

पहिल्या सहा फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त होत्या. त्यानंतर वैद्यकीय समुपदेशन समिती, नवी दिल्लीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विशेष रिक्त जागांच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या. या प्रक्रियेतून उर्वरित जागाही मोठ्या प्रमाणात भरल्या गेल्या. सर्व प्रवेश सीईटी कक्षामार्फत झाल्याने प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राज्यातील ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ हजार ६५ जागा उपलब्ध होत्या. या सर्व जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामुळे शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची टक्केवारी शंभर टक्के आहे. दुसरीकडे, २६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ३ हजार ३४९ जागांपैकी ३ हजार ३२९ जागांवर प्रवेश झाले असून, २० जागा रिक्त आहेत.

दोन खासगी वैद्यकीय विद्यापीठांमधील ४५० जागांपैकी ४४० जागांवर प्रवेश झाले असून, १० जागा रिक्त राहिल्या आहेत. अशा प्रकारे राज्यातील एकूण ७१ वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील एमबीबीएसच्या ८ हजार ८६४ जागांपैकी ८ हजार ८३४ जागांवर प्रवेश झाले आहेत.

बीडीएस अभ्यासक्रमालाही यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील पाच शासकीय दंत महाविद्यालयांमधील ३१७ जागांवर शंभर टक्के प्रवेश झाले आहेत. २३ खासगी दंत महाविद्यालयांमधील २ हजार २०० जागांपैकी २ हजार १९९ जागांवर प्रवेश झाले असून, केवळ एक जागा रिक्त आहे. तर एका खासगी वैद्यकीय विद्यापीठातील बीडीएसच्या १०० जागांपैकी ८१ जागांवर प्रवेश झाले असून, १९ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण २९ दंत महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील २ हजार ६१७ जागांपैकी २ हजार ५९७ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT