

मुंबई : दिवाळीच्या सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतील रक्तसंकलनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुसरीकडे रुग्णालयांमधील रक्ताची मागणी कायम आहे. नियमित रक्तदाते सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेल्याने आणि रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने रक्तपेढ्यांसमोर रक्तसाठा टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाने रक्तदानासाठी आवाहन केल्यानंतर आता सायन आणि सर जे. जे. रुग्णालयांतूनही तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सायन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २८ वर्षीय रुग्णाचे हिमोग्लोबिन अवघे ५ ग्रॅम असल्याने त्यांना तातडीने रक्तसंक्रमणाची आवश्यकता आहे. या रुग्णाचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असून, प्रकृती लक्षात घेता लवकरात लवकर रक्त उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, सर जे. जे. रुग्णालयात दाखल असलेल्या ४४ वर्षीय रुग्णावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी बी पॉझिटिव्ह रक्ताच्या पाच युनिट्सची गरज आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालयातही कर्करुग्णांच्या उपचारांसाठी रक्त आणि रक्तघटकांची नियमित आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन रुग्णालयाने दोन दिवसांपूर्वीच नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.
सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विविध आस्थापनांनी रुग्णालयाबाहेर रक्तदान शिबिरे आयोजित करून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र रक्तदाते टाटा रुग्णालयाच्या सर्व्हिस बिल्डिंगमधील सहाव्या मजल्यावरील रक्तपेढीत रक्तदान करू शकतात.
सुट्टी असली तरी रक्ताची गरज कायम
दिवाळीच्या काळात नागरिकांचे बाहेरगावी जाणे, कौटुंबिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरांच्या आयोजनातील मर्यादा यामुळे रक्तसंकलनावर परिणाम होतो. मात्र अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, कर्करुग्ण आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची गरज कायम असते. काही रुग्णांना तातडीने रक्तसंक्रमण करावे लागते, तर नियोजित शस्त्रक्रियांसाठीही रक्ताचा पुरेसा साठा आवश्यक असतो. त्यामुळे निरोगी आणि पात्र रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.