मुंबई : महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि ई-बाईक टॅक्सी सेवांच्या अमराठी चालकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्याची घोषणा केल्यानंतर ही सक्ती अमलात येण्यापूर्वीच या अमराठी चालकांसाठी मराठी भाषा वर्ग भरवण्याचा पवित्रा आता राज्य सरकारने घेतला आहे.
रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे, म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच आहे. पण काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी असल्याचे स्पष्ट करत 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहील. अन्यथा परवाने रद्द करू व हे परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.
मराठी सक्तीची दणदणीत घोषणा करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक मंत्रालयात घेत अमराठी चालकांना मराठी शिकवण्याचा नवा ‘समंजस’ पवित्रा घेतला. काही अमराठी चालकांच्या मनात निर्माण झालेली अनावश्यक भीती दूर करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमराठी वाहनचालकांवर मराठी बोलण्याचे अनावश्यक दडपण न आणता, खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकविण्याची भूमिका घेतली आहे. अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठीचे जुजबी ज्ञान यावे म्हणून मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्यिक या चालकांसाठी शिकवणी वर्ग घेणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे अमराठी चालकांना मराठी शिकवण्याच्या मोहिमेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षाही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.
कोकण मराठी साहित्य परिषदने आपल्या 72 शाखांमधून अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठीचे शिकवणी वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई मराठी साहित्य संघानेही आपल्या हजारो स्वयंसेवी शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन मराठी भाषा प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रशिक्षणासाठी चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.
या वर्गांसाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. हा अभ्यासक्रम कधी येणार, तो हजारो अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक कधी पूर्ण करणार आणि ते व्यवहारात मराठीचा वापर कधी करतील, याबाबत मात्र स्पष्टता नाही.
अमराठी चालकांसाठीचे मराठी भाषा वर्ग कधीपासून सुरू होणार, किती काळ चालणार याचे कोणतेही वेळापत्रक नसल्याने महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मेपर्यंत कुणीही अमराठी चालक कोणत्याही वर्गातून मराठी भाषा पारंगत होऊन सोडाच, मराठीचे जुजबी ज्ञानही घेऊन बाहेर पडणे शक्य नाही. याचाच अर्थ महाराष्ट्र दिनापासून अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येणे सक्तीचे करणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत संपूर्ण राज्यभर रिक्षा व टॅक्सी चालकांच्या परवान्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतच चालकांना मराठी भाषेचे व्यवहारज्ञान आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाईल.प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री