मुंबई: राज्यातील कुपोषणाचे आव्हान अद्याप कायम असल्याने गंभीर तीव्र कुपोषित (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी दिले. माता व बालकांच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस कुपोषण रोखण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे नमूद करत जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
कुपोषित बालकांची स्थिती, उपचार व्यवस्थापन आणि विविध पोषण योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना बालकांचे नियमित वजन मोजणे, अद्ययावत नोंदी ठेवणे, पोषण पंधरवाडा, चावडी वाचन आणि समुदाय सहभागाच्या माध्यमातून जनजागृती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आदिवासी भागातील मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, गर्भवती महिलांचे पोषण, रक्तक्षय नियंत्रण तसेच कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला. अमृत आहार योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. लाभार्थ्यांना केळी, अंडी आणि इतर पोषक आहाराचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
धाराशिव, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मेळघाट, कोल्हापूर आणि निफाड आदी भागांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कुपोषणाविरोधातील उपाययोजना अधिक तीव्र करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. दुर्गम भागांमध्ये डे-केअर सेंटरचा विस्तार आणि माता-बालकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.
डॉ. सावंत म्हणाले, “कुपोषणमुक्त महाराष्ट्र हे केवळ शासकीय उद्दिष्ट नाही, तर राज्याच्या भावी पिढीच्या आरोग्याशी संबंधित मिशन आहे. बालकांच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात योग्य पोषण, वेळेवर उपचार आणि प्रभावी देखरेख सुनिश्चित केली तर कुपोषणावर निर्णायक मात करता येईल. प्रत्येक जिल्ह्याने मोजता येतील असे परिणाम साधण्यावर भर द्यावा.”