मुंबई: महाराष्ट्रातील तरुणांना देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या क्षेत्रांतील कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.
त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा संकल्प अभियानांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या कार्यक्षम युवाशक्ती असून, उद्योगांना कुशल मनुष्यबळ आणि तरुणांना रोजगाराची गरज आहे. या दोघांना जोडण्याचे काम रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या उपक्रमाला महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस संबोधले. कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये ४१८ ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
एक लाखांहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली असून, १ हजार ५०० हून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.
उमेदवारांना रोजगारासाठी सात दिवसांचे मोफत पूर्वप्रशिक्षण देण्यात आले असून, आतापर्यंत ६१ हजार तरुणांनी त्याचा लाभ घेतला आहे. किमान ७० टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराशी जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे लोढा यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता कौशल्य विकास विभागासोबत काम सुरू असल्याचे सांगितले. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी परदेशात रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांना आवश्यक भाषा व कौशल्य प्रशिक्षण देण्याची तयारी शासनाने केली असल्याचे नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दोन उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाला महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, वरिष्ठ अधिकारी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.