Vidhan Parishad Election Pudhari
मुंबई

Vidhan Parishad Election: विधान परिषद; कोणाला संधी, कोणाचा पत्ता कटणार? निवडून येण्यासाठी 28 ते 29 मतांचा कोटा आवश्यक

विशेषतः उद्धव ठाकरे पुन्हा निवडणूक लढवणार की दुसऱ्या कोणत्या नेत्याला संधी देणार हा उत्सुकतेचा विषय आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा समावेश असल्याने या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

विशेषतः उद्धव ठाकरे पुन्हा निवडणूक लढवणार की दुसऱ्या कोणत्या नेत्याला संधी देणार हा उत्सुकतेचा विषय आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत. त्यामुळे एका जागेवर ठाकरे शिवसेनेचा दावा मजबूत आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने शरद पवार यांना संधी दिली.

त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी जागा दिली जाणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार हे निश्चित मानले जाते. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्या नावावर महाविकास आघाडीत एकमत होऊ शकते. मात्र उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवितात की पक्षातील अन्य कोणाला संधी देतात याबाबत उत्सुकता आहे.

भाजपकडून संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. पण संजय केणेकर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. भाजपमधून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना संधी निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या जागेसाठी मात्र पक्षात स्पर्धा रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी यांना दुसऱ्यांदा संधी देते की अन्य नेत्याला संधी मिळतेे याबाबतही राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे.

असे असेल जागांचे गणित

पक्षीय बलाबलाचा विचार करता विधानसभेतील सध्याच्या आमदारांच्या संख्येनुसार एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी सुमारे 28 ते 29 मतांच्या कोट्याची गरज भासणार आहे. महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे भाजप पाच जागा सहज निवडून आणू शकते. शिवसेना (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक तर महाविकास आघाडीची एक जागा सहज निवडून येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT