

मुंबई: ऑनलाईन फसवणुकीचे ‘जमतारा’प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरू आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधीक्षक यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
या रॅकेटला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉल सेंटर आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही, असा आरोपही सपकाळ यांनी केला. अशोक खरात याच्याशी नाशिकचे डीआयजी दत्ता कराळे यांचे संबंध असल्याचे व्हिडीओ नुकतेच प्रसार माध्यमांमध्ये दिसले. हे दत्ता कराळे व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व सोमनाथ घार्गे या दोघांचाही या बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटशी संबंध असल्याची माहिती आहे.
सीबीआयने 8 ऑगस्ट व 11 सप्टेंबर 2025 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरनुसार नाशिक आणि इगतपुरी येथे छापे टाकून बोगस कॉल सेंटर रॅकेट चालवणाऱ्यांना अटक केली. पण बोगस कॉल सेंटरचा सुगावा महाराष्ट्र पोलिसांना का लागला नाही? सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची सीबीआयकडून माहिती घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी केला.