चार जागांसाठी इच्छुक अनेक; विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी pudhari photo
मुंबई

Maharashtra MLC Election : चार जागांसाठी इच्छुक अनेक; विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी

भाजपमधील जुन्या-नव्या दावेदारांकडून वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 पैकी 4 जागा या संख्याबळाच्या आधारे भाजपच्या वाट्याला येणार आहेत. या जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून भाजपमधील अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

संघटनात्मक कामातील नेत्यांपासून लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांनीही दावेदारी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीत संधी हुकली, आता विधान परिषदेत तरी वर्णी लागावी म्हणून इच्छुक नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. पक्षाच्या धोरणानुसार यातील किती जणांना पुन्हा संधी मिळते आणि किती जणांचा पत्ता कट होतो,

यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेषतः प्रादेशिक समतोल आणि जातीचे समीकरण पाहता पक्ष नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देणार की जुन्यांनाच कायम ठेवणार, याची उत्सुकता वाढली आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपात इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून कोणते निकष निश्चित केले जातील, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

जुन्या नेत्यांकडून फिल्डिंग

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, माधवी नाईक यांसारख्या संघटनात्मक नेत्यांसोबतच माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय, महायुतीच्या जागावाटपामुळे विधानसभेत ज्यांना संधी मिळू शकली नाही, अशा मातब्बर नेत्यांनीही फिल्डिंग लावली आहे. अशावेळी पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी द्यायची की निवडणुकीतील गणिते पाहून नवीन उमेदवारांना मैदानात उतरवायचे, यावरून भाजपात सध्या खल सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असल्याने प्रतीक्षेत असलेले नेते आवश्यक जनसंपर्काला लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT