मुंबई: संपूर्ण राज्यात केवळ 19 टक्के दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा योग्य वापर होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील रस्त्यावरील निरीक्षण अभ्यासात असे दिसून आले आहे की, मोटारसायकलस्वारांमध्ये हेल्मेटचा योग्य वापर केवळ 19 टक्के इतका कमी होता. मागे बसणाऱ्यांमध्ये (पिलियन रायडर्स) हेच प्रमाण 4 टक्के आहे.
जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचा एक भाग असलेल्या जॉन्स हॉपकिन्स इंटरनॅशनल इंज्युरी रिसर्च युनिटने ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीच्या माध्यमातून हे निरीक्षण नोंदवले. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी अलीकडेच हा अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध केला.
हेल्मेट वापरावरील अभ्यासासाठी 2.17 लाख निरीक्षणे करण्यात आली आणि सीट-बेल्ट व लहान मुलांसाठीच्या सुरक्षा साधनांच्या वापरावरील अभ्यासासाठी 1.75 लाख निरीक्षणे करण्यात आली.
राइड-शेअर वाहनांमध्ये सर्वाधिक अतिवेगाचे उल्लंघन
सरकारी आणि खासगी वाहने (20 टक्के), टॅक्सी (9 टक्के) आणि व्यावसायिक वाहनांच्या (7 टक्के) तुलनेत राइड-शेअर वाहनांमध्ये (23 टक्के) अतिवेगाचे उल्लंघन सर्वाधिक वेळा होत असल्याचे आढळून आले.
एक्स्प्रेस-वेच्या तुलनेत राज्य महामार्गांवर (21 टक्के) आणि राष्ट्रीय महामार्गांवर (15 टक्के) अतिवेग जास्त असल्याचे आढळून आले. वाहनांच्या प्रकारानुसार पाहिल्यास, सेडान (25 टक्के), एसयूव्ही (21 टक्के) आणि मोटरसायकल (16 टक्के) मध्ये इतर कोणत्याही वाहनांपेक्षा अतिवेगाचे प्रमाण अधिक होते.
वेगाच्या अभ्यासासाठी पथकाने बेसलाइनदरम्यान आणि पाच अतिरिक्त निरीक्षण फेऱ्यांमध्ये, तसेच डिसेंबर 2023, मार्च 2024 आणि ऑगस्ट 2024 मध्ये तीन विशेष सर्वेक्षणांद्वारे एकूण 7.75 लाख निरीक्षणे नोंदवली.
12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहन प्रवाशांमध्ये सीट-बेल्टचा वापर 31 टक्के होता. 12 वर्षांखालील अल्पवयीनांमध्ये बाल सुरक्षा साधनांचा वापर शून्य होता. चालकांच्या (41 टक्के) तुलनेत प्रवाशांमध्ये (13 टक्के) सीट-बेल्टचा वापर खूपच कमी होता.
महिला चालक (71 टक्के) आणि महिला प्रवाशांच्या (17 टक्के) तुलनेत पुरुष चालक (40 टक्के) आणि प्रवासी (11 टक्के) कमी वेळा सीट-बेल्ट वापरतात, असे दिसून आले. व्यावसायिक वाहनांमध्ये सीट-बेल्टचा वापर सर्वात कमी (16 टक्के) आणि टॅक्सींमध्ये सर्वात जास्त (51 टक्के) होतो, असे सर्वेक्षणात आढळून आले.