मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला असून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईतही पुढील चार दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका उष्णतेपासून बचावासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केल्या आहेत.
सांताक्रुझ वेधशाळेमध्ये किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवार आणि बुधवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. गुरुवारी (33 अंश सेल्सिअस) आणखी खाली जाण्यासह आठवड्याअखेर (वीकेंड) सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस राहील, असे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) साप्ताहिक फोरकास्टमध्ये सांगण्यात आले आहे. उष्णतेची लाट कायम असल्याने दुपारी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी किंवा दुपारी थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांवर पडदे किंवा शेड्स लावावेत, तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज नियमितपणे तपासावा, असे सूचित करण्यात आले आहे.
परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेण्यावरही भर देण्यात आला आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा थेट सूर्यप्रकाशात कधीही एकटे सोडू नये, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
शक्यतो घरात राहून थेट उन्हात जाणे टाळावे. वातानुकूलन सुविधा नसल्यास घराच्या खालच्या मजल्यावर किंवा सावलीच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हलका व संतुलित आहार घेण्यासोबतच तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा कपड्याने डोके व चेहरा झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.