मुंबई : गेल्या पंधरा दिवसांत तापमाने पस्तिशी पार केली असून, पारा सातत्याने उसळत असल्याने राज्यात उष्माघाताच्या 5 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र अद्याप मुंबईतसह उपनगरात एकही रूग्ण आढळलेला नाही. पालघरमध्ये 2 , रायगडमध्ये 1, नाशिकमध्ये 1 आणि जळग्वमध्ये 1 उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत.
गेल्यावर्षी राज्यात उष्माघाताचे 347 रुग्ण आढळले होते तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी 1 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 41 होती. मात्र यंदा रूग्णांची संख्या कमी असून उष्माघातासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांत उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी केले आहे.
उष्माघाताच्या संभाव्य घटनांना तोंड देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांनी कोल्ड रूम कार्यान्वित ठेवणे, औषधांचा पुरेसा साठा ठेवणे आणि पोर्टलवरील नोंदी नियमित अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. बाविस्कर यांनी सांगितले.
डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणे, लघवी कमी व पिवळी होणे, शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे.