शासनाकडून 'ईद-ए-मिलाद'च्या सुट्टीत बदल करण्यात आला आहे. (File photo)
मुंबई

Eid-e-Milad | 'ईद-ए-मिलाद'ची सुट्टी १६ की १८ सप्टेंबरला, शासनाकडून सुट्टीत बदल

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोमवारी (दि.१६ सप्टेंबर) रोजी जाहीर केलेली ईद-ए-मिलादची (Eid-e-Milad-Un-Nabi 2024) सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ही सुट्टी आता बुधवार (दि. १८ सप्टेंबर) या दिवशी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद- ए- मिलाद सणाची सुट्टी सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शवण्यात आली आहे. ईद- ए- मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रामध्ये सोमवारी १६ सप्टेंबर रोजी घोषित केलेली ईद- ए- मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती आता बुधवारी दि. १८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिवस विचारात घेऊन सोमवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करुन बुधवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे शासनाने अधिसूचनेत म्हटले आहे.

ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल केल्याबाबतची शासनाकडून अधिसूचना जारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT