Siddhivinayak Temple Mumbai pudhari photo
मुंबई

Siddhivinayak Temple Mumbai : सिद्धिविनायकाच्या भाविकांसाठी बांधणार प्रतीक्षालय, यात्री निवास

राम मॅन्शनमधील २० सदनिका खरेदीस न्यासाला शासनाची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरालगतच्या राम मॅन्शन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील १३ निवासी सदनिका आणि सात व्यावसायिक जागा खरेदी करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली.

या खरेदीसाठी ९४ कोटी ११ लाख ६५ हजार ५५० रुपये खर्च करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि इतर खर्चही न्यासाच्या उपलब्ध निधीतून करण्यात येणार आहेत.

मंदिर न्यासाच्या उपलब्ध निधीतून या खरेदीचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. राज्य शासनावर याचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही.देश-विदेशातून दररोज मोठ्या संख्येने भाविक सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराची सध्याची जागा मर्यादित असल्यामुळे भाविकांच्या रांगांचे व्यवस्थापन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना अडचणी येतात.

७०८ चौ. मी. जागेची खरेदी

उत्सवांच्या काळात अतिरिक्त मंडप उभारणे आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी न्यासाला दरवर्षी मोठा खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंदिरालगतची राम मॅन्शन सोसायटीची मालमत्ता खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्‍यानुसार, राम मॅन्शन सोसायटीतील फायनल प्लॉट क्रमांक ८९९, सर्वे क्रमांक १७६८ (पार्ट) आणि सी.एस. क्रमांक १२१० (पार्ट) येथील एकूण ७०८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मालमत्तेच्या खरेदीला शासनाने मंजुरी दिली आहे.

निवासी ६६ हजार, व्यावसायिक जागांसाठी १.११ लाख रुपये दर

या व्यवहारात १३ निवासी सदनिकांची खरेदी संबंधित सदनिकाधारकांच्या चटई क्षेत्रासह ४० टक्के वाढीव चटई क्षेत्राचा विचार करून प्रतिचौरस फूट ६६ हजार रुपये या दराने करण्यात येणार आहे, तर सात व्यावसायिक जागांसाठी संबंधित चटई क्षेत्राच्या आधारे प्रतिचौरस फूट १ लाख ११ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

भाविकांसाठी विविध सुविधा

राम मॅन्शनची मालमत्ता मंदिराच्या सध्याच्या प्रतीक्षालय इमारतीला लागून असल्याने या जागेचा उपयोग भाविकांच्या रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच प्रतीक्षालय, स्वयंपाकगृह, साठवणगृह, यात्री निवास, मर्यादित वाहनतळ आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करता येणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

शासनाच्या अटी

  • खरेदीपूर्वी शासकीय भूमिअभिलेख विभागाकडून जागेची मोजणी करणे.

  • मालमत्तेच्या मालकी हक्कांची आणि संभाव्य बोजे, गहाण, न्यायालयीन वाद तसेच तृतीय पक्षाच्या दाव्यांची कायदेशीर तपासणी करावी.

  • मालमत्तेचा निर्विवाद मालकी हक्क आणि हस्तांतरणाची पात्रता निश्चित झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण करावा.

  • विक्रेत्यांना संपूर्ण रक्कम वैध व नोंदणीकृत दस्तऐवजांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणित बँक खात्यातून आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारेच द्यावी.

  • खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मालमत्तेच्या नोंदी न्यासाच्या नावावर अद्ययावत कराव्या आणि संबंधित जागेचा वापर केवळ सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वैधानिक उद्देशांसाठी तसेच भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT