Stray Dog Issue pudhari photo
मुंबई

Stray Dog Issue : मुंबईत तीन श्वान निवारा केंद्रे उभारणार

उदय सामंत : विधानसभेत भटक्या कुत्र्यांवरून खडाजंगी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा शुक्रवारी विधानसभेत चांगलाच गाजला. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सरकारला धारेवर धरले. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना, मुंबईतील मालाड, मुलुंड आणि माहुल येथे पुढील सहा महिन्यांत अत्याधुनिक श्वान निवारा केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर वाढत असलेले हल्ले, जालना जिल्ह्यात सात वर्षीय मुलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि राज्यातील वाढती दहशत याकडे लक्ष वेधत आमदार खोतकर यांनी सरकारकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली. या चर्चेत आमदार नमिता मुंदडा, सना मलिक, मनीषा चौधरी, स्नेहा दुबे आणि अमीन पटेल यांनीही उपप्रश्न विचारत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडावी, अशी मागणी केली.

मंत्री सामंत यांनी त्यावर उत्तर देताना, महाराष्ट्रात सध्या सुमारे १४.८० लाख भटके कुत्रे असून त्यापैकी ९४ हजार कुत्रे मुंबईत आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी 'प्राणी जन्म नियंत्रण विभाग' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला. ते म्हणाले की, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण आणि त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षांत राज्यात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. २०२४-२५ मध्ये २.३३ लाख कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि साडेतीन लाखांहून अधिक कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले.

२०२५-२६ मध्ये ३.१८ लाख कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि ४.८४ लाख कुत्र्यांचे अँटी-रेबीज लसीकरण पूर्ण झाले असून ही मोहीम यंदाही युद्धपातळीवर सुरू असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच जालना येथील घटनेबद्दल खेद व्यक्त करत अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी राज्य सरकार आवश्यक उपाययोजना करत असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT