मुंबई: मंत्रालयात वर्षानुवर्षे महत्त्वाच्या विभागांमध्ये एकाच पदावर किंवा विशिष्ट खात्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने अशा ३१४ अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून या अधिकाऱ्यांना तत्काळ इतर विभागात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मंत्रालय आणि राज्य सरकारच्या अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये काही अधिकारी दहा-दहा वर्षांपासून ठाण मांडून आहेत. राजकीय वरदहस्त, विभागातील वरिष्ठांसोबत संधान बांधून काही अधिकारी-कर्मचारी ठाण मांडून आहेत.
यापूर्वी मंत्री आस्थापनेवर अनेक वर्षांपासून रुजू असलेल्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत नवीन अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती.
तसेच, मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय मंत्र्यांच्या आस्थापनेवर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांची कसून छाननी करण्यात आली आहे. त्यामुळे हे अधिकारी हबकले आहेत.
विशेष म्हणजे, काही अधिकारी मधल्या काळात काही काळासाठी इतरत्र जाऊन पुन्हा आपल्या जुन्याच खात्यावर आपले स्थान पक्के करतात, अशा चलाख अधिकाऱ्यांवरही आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
सध्या ३१४ अधिकाऱ्यांची नावे समोर आली असली, तरी या मोहिमेत आणखीही काही अधिकारी रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात होणाऱ्या बदल्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
ठाण मांडून बसलेले अधिकारी राजकारण्यांशी संधान साधून असल्याने त्यांची उचलबांगडी करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नव्हते. उलटपक्षी या अधिकाऱ्यांचा दबाव यंत्रणेवर होता. त्यामुळे हे अधिकारी डोईजड बनून राहिले आहेत. आता मात्र थेट मुख्यमंत्री कार्यालयाचा आदेश आल्याने या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.