मुंबई : राज्यातील अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तीन आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून (१६ जुलै) पुढील प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी शिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंद करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील ९ हजार ६९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १४ लाख ८७ हजार ७५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ११ लाख ६३ हजार २० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विशेष फेरी-२ साठी ७१ हजार ७०६ विद्यार्थ्यांनी अर्जाच्या भाग-२ मध्ये पसंतीक्रम निश्चित केला होता.
सुधारित वेळापत्रकानुसार १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजल्यापासून १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-२ भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. या फेरीचे प्रवेश वाटप १९ जुलै रोजी करण्यात येणार असून, २० जुलै रोजी सकाळी १० वाजता प्रवेश यादी आणि गुणपात्रता जाहीर केली जाईल.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २० ते २२ जुलैदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यानंतर २३ जुलै रोजी माहिती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि २४ जुलै रोजी दुपारी १ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
दरम्यान, राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले असून, विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
४७ हजारांहून अधिक मुलींनी घेतले प्रवेश
अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मुलींसाठी राबविण्यात आलेल्या विशेष फेरी-२ मध्ये ७१ हजार ७०६ विद्यार्थिनींनी अर्जाच्या भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम अंतिम केला होता. त्यापैकी ५३ हजार ८२४ विद्यार्थिनींना १३ जुलै रोजी प्रवेशाचे वाटप करण्यात आले होते, त्यानंतर १४ जुलैअखेर ४७ हजार ३३० विद्यार्थिनींनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली.