Mumbai Schools Pudhari
मुंबई

Mumbai Schools: पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; नवीन गणवेश मिळणार

140 कोटींपैकी 84 कोटी रुपये शासनाकडून वितरीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू झाली आहे. नव्या वर्षात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश, बूट आणि पायमोजे मिळावे, यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून या साहित्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने मंजूर निधीपैकी 60 टक्के म्हणजेच 84 कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवा गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट व पायमोजे योजनेसाठी एकूण 140 कोटी रुपयांची तरतूद असताना, त्यापैकी 60 टक्के म्हणजेच 84 कोटी रुपयांचा निधी सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमुळे शाळा व्यवस्थापन समित्यांना प्रत्यक्ष खरेदी आणि वितरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येणार आहे.

समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. यासाठी प्रति विद्यार्थी 600 रुपये निश्चित करण्यात आले असून, याशिवाय बूट आणि पायमोज्यांसाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध आहे.

योजनेचा लाभ सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी तसेच दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांतील मुलांना दिला जातो. यंदा निधी वेळेत उपलब्ध झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेश खरेदीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी, शाळा सुरू होताच नवीन गणवेश मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT