Fodder Pudhari
मुंबई

Maharashtra Fodder Scheme: चारा लागवडीसाठी सरकारची धावपळ; व्हीबी-जी राम जी योजनेतून हेक्टरी १ लाख १३ हजारांपर्यंतचा खर्च उचलणार

दुष्काळग्रस्त भागातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी व्हीबी-जी राम जी योजनेतून चारा लागवडीसाठी हेक्टरी १.१३ लाख रुपयांपर्यंत खर्च सरकार उचलणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दुष्काळग्रस्त भागातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तलाव आणि धरणाजवळील गाळपेर्‍याची जमीन चारा लागवडीसाठी दिली जाणार आहे.

गायरान आणि वैयक्तिक जमिनीवरील चारा पिकांच्या लागवडीसाठी व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत हेक्टरी १ लाख १३ हजार रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलणार आहे.

दरम्यान, अतिरिक्त चार्‍यासाठी शेजारच्या जिल्ह्यांना मुभा देण्यात आली असली, तरी राज्याबाहेर चारा पाठविला जाऊ नये म्हणून राज्यबंदी असणार आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलाशय, तलावांतील गाळपेरा क्षेत्र फक्त चारा पिकांच्या लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या संबंधीच्या समितीचे अध्यक्ष आहेत.

दुसरीकडे, गायरान तसेच वैयक्तिक जमिनीवर विकसित व्हीबी-जी राम जी ग्रामीण या योजनेंतर्गत चारा पिके लागवडीची कामे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैयक्तिक आणि गायरान जमिनीवरील चारा लागवडीसाठी हेक्टरी ३५ हजार ५०५ रुपयांपासून तब्बल १ लाख १३ हजार २९० रुपयांचा खर्च उचलण्यास मंजुरी दिली आहे.

मका पिकाच्या विविध वाणांसाठी मजुरीपोटी ३० हजार ११५ आणि सामग्रीसाठी १७ हजार १९२ असे ४७ हजार ३०७ रुपये हेक्टरी देण्यात येतील. बाजरीच्या विविध वाणांसाठी हेक्टरी एकूण ३५ हजार ५०५ रुपये, ज्वारी पिकासाठी ४२ हजार ७७८, नेपियर गवतासाठी ७६ हजार ३१ रुपये, ज्वारी मल्‍टिकटसाठी ५१ हजार ३६, बाजरी मल्टिकटसाठी ७६ हजार ४४ आणि लसूण घाससाठी सर्वाधिक १ लाख १३ हजार २९० इतका खर्च दिला जाणार आहे. व्हीबी-जी राम जी ग्रामीणच्या माध्यमातून चारा पिकांच्या लागवडीसाठी निधी मिळणार आहे.

सध्या राज्यातील ११६ उत्पादकांपैकी ९७ उत्पादकांकडे ५८ हजार ३४८ मेट्रिक टन मूरघास उपलब्ध आहे. आगामी काळात आणखी २.२९ लाख मेट्रिक टन मूरघास उपलब्ध होण्याचे नियोजन आहे. उसाच्या वाड्यापासून मूरघास तयार केल्यास चाराटंचाईच्या काळात पशुपालकांना पर्यायी खाद्य उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे.

तसेच, वनजमिनींवरील गवत आणि कुरणाचा लिलाव करू नये. जाळपट्टे करण्यापूर्वी गवताची कापणी करावी. वन जमिनीवरील चारा गवताची त्वरित कापणी करणे, साठवणे व आवश्यकतेनुसार पशुपालकांना उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ज्या वन जमिनीवर सिंचनाची सोय असेल तिथे चारा लागवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT