मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी केली आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांनीही आपला 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपले 1 महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले आहे.
गणेशोत्सवात लालबागच्या राजाला कोट्यवधी भाविक रोख रक्कम, दागिने आणि दानरूपाने मोठा निधी अर्पण करतात. या रकमेचा विनियोग मंडळाने नेहमीच सामाजिक आणि लोकहिताच्या कामासाठी केला आहे. पूर, दुष्काळ, कोरोना अशा आपत्तीच्या काळात तसेच अन्य वैद्यकीय व सामजिक कामासाठी मंडळ सातत्याने गरजूंच्या मदतीला धावून जाते.
यापूर्वीही मंडळ कोकणातील दरडीच्या दुर्घटना, पूर, दुष्काळ, कोरोना अशा आपत्तीच्या काळात तसेच अन्य वैद्यकीय व सामजिक कामासाठी मंडळ सातत्याने गरजूंच्या मदतीला धावून आले आहे. मराठवाड्यातील भावंडांवर आलेल्या संकटाची जाणीव ठेवून आम्ही ही मदत जाहीर केल्याचे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.
मदतीसाठी सीएसआर फंड वापरा; बावनकुळे
नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकार भरघोस मदत करणार आहे. परंतु, राज्यातील मोठ्या उद्योजकांनी आपल्या सीएसआर फंडातूनही शेतकर्यांना मदत करावी, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राज्याचा जवळपास अर्धा भाग पूरग्रस्त झाला असून, महसूल अधिकार्यांना अचूक पंचनामे करण्याचे आपण आदेश दिले आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सध्या मोठे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली आहे, असे ते म्हणाले.
शिक्षकांकडून मदत जाहीर
मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी यांच्या पाठोपाठ आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या मदतीसंदर्भात कळवले आहे.