मुंबई : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ख्रिसमससह वर्षभरातील प्रमुख सणांसाठी विशेष तपासणी यंत्रणा राबविण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक सणाच्या आधी, सणादरम्यान आणि सणानंतर तपासणी व कारवाई करण्यासाठी चार टप्प्यांचे नियोजन करण्यात आले असून, याबाबतचा आदेश लवकरच जारी केला जाणार आहे, अशी माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली.
मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मुंडे यांनी सणासुदीतील अन्नसुरक्षेबाबत एफडीएची भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी प्रत्येक सणाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आदेश काढून तपासणी केली जात होती. आता वर्षभरातील प्रमुख सणांचा समावेश असलेले एकत्रित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. संबंधित सणाच्या आधीपासूनच तपासणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्याची पद्धत त्यातून निश्चित होणार आहे.
महाप्रसाद, भंडाऱ्यांनाही समान नियम
गणेशोत्सवातील महाप्रसाद किंवा भंडारा हा धार्मिक परंपरेचा विषय नसून अन्नसुरक्षेचा विषय आहे. महाप्रसाद, भंडारा, स्ट्रीट फूड, रेस्टॉरंट किंवा पंचतारांकित हॉटेल असो, सर्वांसाठी अन्नसुरक्षेचे नियम समान आहेत, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
महाप्रसाद किंवा भंडाऱ्यात वापरला जाणारा कच्चा माल, खाद्यतेलाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया नियमांनुसार आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. अन्न व्यवसाय करणाऱ्यांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊन अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनीही काळजी घ्यावी
सणासुदीच्या काळात नागरिकांनी जास्त चरबीयुक्त, खारट आणि गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे. पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुंडे यांनी केले. सणांच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने अन्नाची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र, एफडीएकडून केवळ सणांच्या काळातच नव्हे, तर वर्षभर खाद्य व्यवसायांची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी दसरा-दिवाळीचे वेध लागले की एफडीएच्या खासकरून खवा जप्त करण्यच्या कारवाया सुरू होतात. ठिकठिकाणी मिठाई वकिणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे टाकून फक्त खवा जप्तीच्या बातम्या महाराष्ट्र वाचत आला आहे. यंदा मात्र सणासुदिचे वेध लागण्यापूर्वीच एफडीएने राज्यभर सुरक्षित अन्न-सुरक्षित महाराष्ट्र अभियान सुरू केले आणि हॉटेल व्यसायाचा माहोलच बदलून गेला. आता यंदाची दसरा-दिवाळी तर एफडीएच्या कारवायांच्या बाबतीतही नेहमीपेक्षा वेगळी ठरण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
‘स्ट्रीट फूड’ म्हणजे चुकीचे नाही
‘स्ट्रीट फूड म्हणजे चुकीचे आणि पंचतारांकित हॉटेलमधील अन्न म्हणजे नेहमीच चांगले’, असा एफडीएचा दृष्टिकोन नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. अन्नाची सुरक्षितता ही व्यवसायाच्या ठिकाणावर नव्हे, तर अन्न तयार करण्याची पद्धत, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि नियमांचे पालन यावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.