

मुंबईः मुंबईतील ३० टक्के गणेशमूर्ती सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये अद्याप दाखल व्हायच्या आहेत. भुलेश्वरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या उर्वरित आगमन मिरवणुकांबद्दल बृन्हमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांची चिंता व्यक्त केली.
पुढारीच्या माहितीनुसार भुलेश्वरचा राजा मंडपापर्यंत जाताना तीन ठिकाणी खड्ड्यांना सामोरा गेला. खड्ड्यांचे गचके सहन करत ही मूर्ती भुलेश्वरपर्यंत पोहोचली. मात्र, तोपर्यंत तिची स्थिती नाजूक झाली होती. शेवटी ती कोसळी आणि दोघांचा मृत्यू ओढावला.
या पार्श्वभूमीवर ॲड. दहिबावकर म्हणाले, मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्े बुजविण्याचे कामे अजूनही बाकी आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती आणताना रस्त्यातील खड्ड्यांची स्थिती बघायला लागते, त्यामुळेच आम्ही गणेशोत्सवात वारंवार रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत असतो. भुलेश्वरच्या घटनेनंतर गणेश मंडळे अधिक सतर्क झाले आहेत, त्यामुळे रोजच रस्त्यावरील खड्ड्याबाबत सार्वजनिक गणेश मंडळांच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत.
मुंबई व उपनगरात सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यातील 30 टक्के मुंबईत तर 70 टक्के मंडळे ही उपनगरात आहेत. सुमारे 70 टक्के सार्वजनिक मंडळांनी मूर्ती मंडपांत आणल्या असल्या तरी अद्याप 30 ट्क्के मूर्ती मंडपात आणणे बाकी आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकांतही मंडळांना खड्ड्याचा सामना करावा लागू नये, यासाठी महापालिकेने सर्व संबंधित यंत्रणासोबत काम करावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेने अलीकडेच प्रभाग (वॉर्ड) अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या झालेल्या अधिकार्यांना नव्या प्रभागातील कामाचा अंदाज उत्सवा दरम्यान येत नाही, त्यामुळे गणेश मंडळांना उत्सवा दरम्यान अडचणी येतात. समन्वय समिती म्हणून ऐनवेळी आम्हांला मंडळे आणि पालिका यांच्यात उत्सवात समन्वय साधता येत नाही, महापालिकेला बदल्या करण्याचा अधिकार आहे.
परंतू उत्सवात होणारी गर्दी आणि निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेता, त्या - त्या प्रभागात जुने आणि अनुभवी अधिकारी महापालिकेने नियुक्त करावेत, अशी मागणी ॲड. दहिबावकर यांनी केली. या अधिकार्यांच्या त्या - त्या यंत्रणांशी समन्वय नसल्याने खड्ड्यां सह अनेक प्रश्न निकाली उत्सवाच्या तोंडावरही निकालात निघत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आज मुख्यमंत्र्यासमवेत बैठक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक आहे. या बैठकीत आम्ही गणेश मूर्तीच्या उंचीचा, खड्ड्यांचा तसेच मुंबईतील रेल्वे पुलांवरून गणेश मिरवणूका नेतांना घालण्यात आलेले निर्बंध यांसंदर्भात चर्चा करणार आहोत, असे बृन्हमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. मागील वर्षांपासून मुंबई महापालिका मंडपांना परवानगी देतांना गणेश मूर्तीची उंची विचारात घेत आहे. मूर्तीची उंची ही शासनाच्या अख्यात्यारितील बाब आहे, असेही ते म्हणाले.