Tukaram Mundhe Pudhari
मुंबई

School food safety inspection : शाळेतील मध्यान्ह भोजनाची एफडीएकडून तपासणी होणार

अंगणवाडीतील आहार, केंद्रीय स्वयंपाकगृहेही रडारवर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शाळेतील मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि दर्जेदार आहे की नाही, याची तपासणी आता अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे. शाळांमधील मध्यान्ह भोजनासोबतच अंगणवाडीतील आहार आणि केंद्रीय स्वयंपाकगृहांचाही तपासणीत समावेश करण्यात आला आहे.

मुंबईतील सुमारे आठ ते दहा केंद्रीय स्वयंपाकगृहांची तपासणी करण्यात आल्याची माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या केंद्रीय स्वयंपाकगृहांपासून ते विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित स्वयंपाकगृहांची स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, कच्च्या मालाचा दर्जा, साठवणूक तसेच अन्नसुरक्षा नियमांचे पालन याची तपासणी केली जात आहे. शाळा आणि अंगणवाडीमध्ये वितरित होणाऱ्या आहाराचे नमुने घेऊन त्यांची तपासणीही केली जात आहे.

मुंढे यांनी सांगितले की, शाळेतील मध्यान्ह भोजनाची तपासणी केवळ तक्रार आल्यानंतरच केली जाणार नाही. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने नियमित तपासणी आणि नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात संतुलन राखण्यावरही एफडीएने भर दिला आहे. जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेले पदार्थ टाळून पौष्टिक आहार देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शाळेतील मध्यान्ह भोजन केवळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले म्हणजे प्रक्रिया संपत नाही. अन्न कुठे तयार होते, कोणत्या कच्च्या मालाचा वापर केला जातो, त्याची साठवणूक कशी केली जाते आणि शाळेपर्यंत ते कोणत्या पद्धतीने पोहोचवले जाते, याचीही तपासणी केली जात आहे. त्यामुळे केंद्रीय स्वयंपाकगृहापासून विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत संपूर्ण अन्नसाखळी एफडीएच्या तपासणीच्या कक्षेत असेल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

  • अंगणवाडी आणि शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यास सुरुवात झाली असून, मुंबईत गेल्या आठवड्यात काही अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी अन्नाची गुणवत्ता तसेच संतुलित आहाराबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले. दर महिन्याला या केंद्रांची तपासणी केली जाणार असून, गरजेनुसार तपासणीची वारंवारता वाढविण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT