मुंबई: ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थांची विक्री व वितरण करणाऱ्या केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली आहे. १३ ऑगस्ट रोजी राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ८६ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, १४ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
एका आस्थापनेची व्यावसायिक कार्यवाही तात्पुरती बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईतील तपासणीत ‘ब्लिंकिट’, ‘झेप्टो’, ‘इन्स्टामार्ट’ यांसह विविध ऑनलाइन अन्नविक्री केंद्रांमध्ये अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नोंदींबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या.
घाटकोपर येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या केंद्राची तपासणी केली असता ७४ पैकी केवळ ३४ गुण मिळाले. अन्नसाठवणुकीचे रॅक अस्वच्छ होते. अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंची योग्य विभागणी नव्हती. कुजलेल्या भाज्या आढळून आल्या. परिसरात झुरळांचा प्रादुर्भाव होता. छत व फरशी खराब झालेली होती.
स्वच्छतागृहाचे दार उघडे ठेवण्यात आले होते. मालाड पश्चिम येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या केंद्राची तपासणी करताना ७४ पैकी ४० गुण मिळाले. शीतगृहाचे तापमान ६ अंश सेल्सिअस आढळले.
सुमारे ४० अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले. अंधेरी पूर्वेतील राजहाडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या इन्स्टामार्ट केंद्रात मुख्य प्रवेशद्वारावर कीटकांना रोखण्यासाठी आवश्यक हवेचा पडदा नव्हता. काही अन्नपदार्थांच्या पिशव्या थेट जमिनीवर ठेवण्यात आल्या होत्या. साठवणुकीची जागा अपुरी होती.
कालबाह्य चिकन आढळले
अंधेरी पश्चिमेतील राजिडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या केंद्राच्या तपासणीत १४० पैकी ८० गुण मिळाले. अन्नपदार्थांचे तापमान नियंत्रण योग्य प्रकारे होत नव्हते. अन्नपदार्थांची आधी आलेली खेप आधी वापरण्याची पद्धतही पाळली जात नव्हती. तपासणीदरम्यान ‘झोराबियन चिकन करी कट’ या उत्पादनाची वापरण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२६ असल्याचे आढळले. हे उत्पादन आवश्यक शून्य ते चार अंश सेल्सिअस तापमानाऐवजी सुमारे आठ अंश तापमानावर ठेवण्यात आले होते. हे कालबाह्य अन्नपदार्थ तपासणीदरम्यानच नष्ट करण्यात आले.
फिल्म सिटीतील कॅफेत माश्यांचा प्रादुर्भाव
गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटीमधील बॉलीवुड कॅफेची तपासणी केली असता स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे समाधानकारक पालन होत नसल्याचे आढळले. भांडी व परिसर अस्वच्छ होते.
परिसरात मोठ्या प्रमाणात माशांचा प्रादुर्भाव आढळला. स्वयंपाकघरात सांडपाणी, घाण आणि अन्नाचे अवशेष आढळले. गंजलेल्या आणि अस्वच्छ पृष्ठभागावर अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचेही निदर्शनास आले