

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा फारसा जोड नसल्यामुळे अजूनही तलाव तहानलेलीच आहेत. तानसा, मोडकसागर, तुळशी, विहार हे चार तलाव ओसंडून वाहू लागले असले तरी भातसा, मध्य वैतरणा व अपर वैतरणा तलाव भरण्यासाठी अजून दिड लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. परंतु मुंबईला पाणीपुरवठा करणारे तीन महत्त्वाची धरण अजून भरणे बाकी आहे. मुंबईत उन्हाळ्यातील पाणी कपात टाळायची असेल तर तलावामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठ्याची आवश्यकता असते.
३० सप्टेंबरला अजून दिड महिन्याचा अवधी असला तरी, ऑगस्टमध्ये पाणीसाठा ९५ ते ९६ टक्केपर्यंत जाणे आवश्यक आहे. पण सध्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस नसल्यामुळे गेल्या आठवड्याभरात पाणी साठ्यात अवघी दोन टक्के वाढ झाली आहे. पाणीसाठा ९० टक्केवर म्हणजेच १३ लाख दशलक्ष लिटरवर पोहचला आहे. त्यामुळे सुमारे दिड लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.
२०२५ च्या तुलनेत पाऊस जास्त
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २०२५ च्या तुलनेत यंदा पाऊस जास्त झाला आहे. उदाहरणार्थ भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २०२५ मध्ये १३ ऑगस्टपर्यंत १९०६ मिमी पाऊस झाला होता. यावेळी २३६५ मिमी पाऊस झाला आहे.
तानसा व मोडक सागर पाणलोट क्षेत्रातही गेल्यावर्षीच्या तुलनेत ५०० मिमी जास्त पाऊस झाला आहे. अप्पर वैतरणा तलावाच्या क्षेत्रात तर गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने जास्त पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १४३२ मिमी पाऊस होता यावेळी ३२७८ मिमी इतका पाऊस झाला आहे.
पाणलोट क्षेत्रात पाऊस हवा
नाशिक जिल्ह्यातील अपर वैतरणा तलावातील पाणीसाठा ८१ टक्केवर पोहचला असून शहराला सर्वाधिक दररोज १८५० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करणाऱ्या भाचा तलावातील पाणीसाठा ८८ टक्के इतका झाला आहे. मध्य वैतरणाचा पाणीसाठाही सुमारे ९३ टक्केवर पोहचला आहे. त्यामुळे ही तीन तलाव तुडुंब भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.