FDA Raid Pudhari
मुंबई

Food Safety Action: मुंबईतील दोन हॉटेलांसह ‘ब्लिंकिट’चा परवाना निलंबित

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. मालाड पश्चिम येथील ‘दिल्ली स्विट अँड भेळपुरी हाऊस’, कुर्ला पश्चिम येथील ‘गुलझार मोहम्मदी हॉटेल’ आणि अकोला येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या तीन आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मालाड येथील दिल्ली स्विट अँड भेळपुरी हाऊसच्या तपासणीत अन्न सुरक्षेच्या गंभीर त्रुटी आढळल्या. भांडी धुण्याच्या जागेतील फ्रीजमध्ये उघडे कच्चे समोसे ठेवण्यात आले होते.

हे अन्न उघड्या गटाराच्या दुर्गंधी व साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येत असल्याचे निदर्शनास आले. स्वयंपाकघराची भिंत मोडकळीस आलेली होती, प्लॅस्टर गळत होते, तर अन्न तयार करण्याच्या जागेवर उघडे बल्ब लटकलेले होते.

तसेच, साफसफाई न केलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी फिल्टर न करता अन्न तयार करण्यासाठी व ग्राहकांना पिण्यासाठी वापरले जात होते. पाण्याच्या चाचणीचे अहवालही उपलब्ध नव्हते.

केवळ ‘प्रिपेअर्ड फूड’ श्रेणीचा परवाना असताना लस्सी, मिठाई, पनीर, फ्रँकी व फरसाणचे उत्पादन आणि पुनर्पॅकिंग केले जात असल्याचे आढळले. लेबल नसलेले पनीर आणि मुदत संपण्याची तारीख नसलेली लस्सी जप्त करण्यात आली. ३६ पैकी २६ अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अनिवार्य वैद्यकीय प्रमाणपत्रही नव्हते.

दरम्यान, कुर्ला पश्चिम येथील गुलझार मोहम्मदी हॉटेलच्या तपासणीत ८८ पैकी केवळ २४ गुण मिळाले. स्वयंपाकघर दाटीवाटीचे आणि अत्यंत अस्वच्छ आढळले. भिंती, छत व दरवाजे तेलकट व दमट होते, तर फरशी तुटलेली व पाण्याचा निचरा व्यवस्थित नसल्याचे आढळले.

स्वयंपाकघरात झुरळांचा वावर, तुंबलेली गटारे, उघड्यावर ठेवलेले शिजवलेले अन्न आणि सडलेल्या भाज्यांचा वापर आढळला. कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय तपासणीचे रेकॉर्ड नव्हते

गोदामातही अस्वच्छता

अकोला येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आस्थापनाला यापूर्वी सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र फेरतपासणीत अनेक त्रुटी कायम असल्याचे आढळले. वॉक-इन चिलर व फ्रीजरचे पडदे फाटलेले व खराब होते. रॅकवर अन्न व अखाद्य वस्तू एकत्र ठेवण्यात आल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT