महाराष्ट्र जगातील 30वी मोठी अर्थव्यवस्था pudhari photo
मुंबई

Devendra Fadnavis : महाराष्ट्र जगातील 30वी मोठी अर्थव्यवस्था

महाराष्ट्र सिंगापूर आणि यूएईला मागे टाकणार : मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रशासकीय गतिमानता आणि प्रभावी धोरणांमुळे गेल्या 10 वर्षांत राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढला आहे. आर्थिक व्याप्तीचा विचार केल्यास आजघडीला महाराष्ट्र देशातील इतर कोणत्याही राज्याशी स्पर्धा करत नसून, जगातील 30 वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. याच प्रगतीच्या वेगाच्या जोरावर पुढील दोन ते तीन वर्षांत आपला महाराष्ट्र हा सिंगापूर आणि यूएई (संयुक्त अरब अमिराती) सारख्या बलाढ्य देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित इमॅजिनेक्स्ट 2026 या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आणि व्हिजन 2047चा सविस्तर लेखाजोखा मांडला. राज्याला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 2015 मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपयांची होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर (660 बिलियन डॉलर) पोहोचली आहे.

राज्याचा सामान्य वृद्धिदर 10 टक्के राहिला असून, देशात सर्वाधिक स्टार्टअप आणि युनिकॉर्न महाराष्ट्रातच आहेत. इतर राज्ये 1 ट्रिलियन डॉलरबद्दल केवळ बोलत आहेत, परंतु सध्या केवळ महाराष्ट्रच या उद्दिष्टाच्या सर्वांत जवळ आहे. 2025-2026 या वर्षातील अल-निनोसारख्या नैसर्गिक आव्हानांमुळे गतीत थोडा फरक पडला तरी, आपण 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करू, असा विश्वास त्यांनी दिला. यासाठी आर्थिक सल्लागार समितीने प्रत्येक क्षेत्राचा विकास आराखडा तयार केला असून विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

दरम्यान, प्रशासनात सुधारणांसाठी 2000 डेटा पॉईंट्स तयार करून ते विभागांना सोपवण्यात आले आहेत. व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन केले आहे. सर्व विभागांची कामगिरी ही 75 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान आहे. देशात सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचा सरासरी दर 35 टक्के असताना महाराष्ट्रात तो 55 ते 60 टक्के आहे. दावोस येथील करारांचे गुंतवणुकीत रूपांतर होण्याचा दर तब्बल 85 टक्के आहे. प्रत्येक करारासाठी एक रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त करण्यात आला असून वॉररूमच्या माध्यमातून थेट देखरेख ठेवली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविस्तार ॲप तयार करण्यात आले असून, राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केले आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी वन स्टॉप सोल्यूशन असून, यावरील एआय एजंट शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतात. विशेष म्हणजे, यात भिल्ली या आदिवासी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून आदिवासी बांधवही त्यांच्या भाषेत प्रश्न विचारू शकतील. भारतातील 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याने तरुण पिढीच्या बळावर तंत्रज्ञानाचा हा स्वीकार राज्याला नव्या उंचीवर नेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • जिओ वर्ल्ड सेंटर येथे दोन दिवसीय इमॅजिनेक्स्ट 2026 या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तंत्रज्ञान, इनोव्हेटर, स्टार्ट अपचे संस्थापक, विविध धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि उद्योग जगतातील आघाडीचे लोक उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या महोत्सवात विविध चर्चा सत्रे, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सुरुवातीच्या सत्रात ज्येष्ठ संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT