Maharashtra EL Nino 2026 Pudhari
मुंबई

Maharashtra EL Nino 2026| पाणी बचतीसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स : फडणवीस

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर सज्जता; वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: संभाव्य एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांच्या बैठक उपाययोजनांचा आढावा घेतला. पाण्याच्या नियोजनासह जल संधारणाची कामे तातडीने मार्गी लावावी, पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संबंधित विभाग तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मे महिन्यात उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी राहील. मात्र उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, पॉझिटिव्ह ‌‘आयओडी‌’ विकसित झाल्यास एल निनोच्या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

आरोग्य योजनांचे एकीकृत व्यवस्थापन

दरम्यान, राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांमधून अधिक प्रभावी व सुलभ मदत मिळावी यादृष्टीने एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शासकीय योजना मदत व समन्वय कक्षसंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आदी विविध आरोग्य योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मागील वर्षभरात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख 22 हजार, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 2 लाख 18 हजार रुग्णांचे अर्ज प्राप्त झाले असून विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT