

नवी मुंबई: राज्यातील सहा पोलिस अधीक्षक, दोन उपायुक्त आणि अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने सोमवारी काढले. यामध्ये चर्चेत असलेले सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची जिल्हा परिषद निवडणुकीतील वाद, सक्तीच्या रजेवर पाठवणे या घडामोडीनंतर आज सांगली पोलिस अधीक्षकपदावर बदली करण्यात आली.
एकाच जिल्ह्यात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. बड्या पोलिस अधिकाऱ्यांची ही बदलीची पहिली यादी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून 53 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी गृह विभागाने तयार केली असून त्यावर अजून निर्णय झालेला नाही.
यामध्ये सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगाव पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे पोलिस उपआयुक्त पुणे यांची पोलिस अधीक्षक सातारा, संदीप घुगे पोलिस अधीक्षक सांगली पोलिस उपआयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई, योगेश गुप्ता पोलिस अधीक्षक, कोल्हापूर पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (पदभार थांबवला), निलोत्पल पोलिस अधीक्षक गडचिरोली ते पोलिस अधीक्षक कोल्हापूर, एम. रमेश अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली ते पोलिस अधीक्षक गडचिरोली, महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक, जळगाव पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे आणि राजकुमार शिंदे पोलिस उपआयुक्त, पुणे पोलिस अधीक्षक, वाशिम यांचा समावेश आहे.